ताज्या बातम्या

पाळधी–तरसोद बायपास खचल्याप्रकरणी सरकार गंभीर; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घटनास्थळी पाहणी, चौकशीचे आदेश


जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाळधी–तरसोद बायपास मार्गावर मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याची गंभीर घटना घडल्यानंतर राज्य सरकारने तातडीने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी खचलेल्या रस्त्याची स्थिती, पावसाच्या पाण्याचा प्रवाह, बांधकामाची गुणवत्ता तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची सविस्तर माहिती घेण्यात आली.

पाहणीदरम्यान मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रस्ता खचण्यामागील कारणांचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. प्राथमिक निरीक्षणात रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित झाल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वीही या प्रकल्पासंदर्भात विविध तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

मंत्र्यांनी स्पष्ट केले की, चौकशीत बांधकामात हलगर्जीपणा, निकृष्ट दर्जाचे साहित्य, तांत्रिक त्रुटी किंवा कोणत्याही स्तरावरील निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. खचलेला भाग सुरक्षित करणे, पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले.

 

यावेळी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, लालचंद पाटील, पिंटू पाटील तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पहिल्याच मुसळधार पावसानंतर कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पाळधी–तरसोद बायपासचा काही भाग खचल्याने या प्रकल्पाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने चौकशीचे आदेश दिल्याने या घटनेस जबाबदार असलेल्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button