शहरातील मानराज पार्क परिसरातील कस्तुरी राज गार्डन, शृंगार फॅमिली रेस्टॉरंटवर महापालिकेची मेहरबानी? नोटिसांनंतरही अतिक्रमण कायम!
छोट्या हातगाडीवाल्यांवर मनपाची कारवाई, मोठ्या हॉटेल्सना मात्र नोटिसा!
जळगाव : शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नॅशनल हायवे क्रमांक सहा मानराज पार्ककडे जाणाऱ्या समांतर रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या दोन मोठ्या हॉटेल्सच्या बांधकामाचा आणि महापालिकेच्या कारवाईचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला आहे. कस्तुरी राज गार्डन आणि शृंगार फॅमिली रेस्टॉरंट या आस्थापनांसाठी आवश्यक महापालिका परवानग्यांबाबत प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित ठिकाणी लोखंडी स्ट्रक्चर उभारून गेल्या तीन-चार वर्षांपासून व्यवसाय सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संबंधित बांधकाम व व्यावसायिक वापरासाठी महानगरपालिकेच्या आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का? याबाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा करण्यात आली असता, संबंधित ठिकाणी आवश्यक प्रकारची परवानगी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, जर परवानगीचा अभाव असेल, तर केवळ नोटीस बजावून प्रशासनाची जबाबदारी संपते का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
संबंधित आस्थापनांना अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, नोटीस बजावल्यानंतरही प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची किंवा नियमानुसार पुढील कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया अद्याप का झालेली नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील सामान्य हातगाडीवाला, छोटा विक्रेता किंवा रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर अतिक्रमणाची कारवाई केली जाते; मग मोठ्या व्यावसायिक आस्थापनांच्या बाबतीतही त्याच निकषांचा वापर होणार का? हा प्रश्न नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
कायदा सर्वांसाठी समान असावा ,अतिक्रमणाचा प्रश्न केवळ एखाद्या व्यक्तीच्या व्यवसायापुरता मर्यादित नसून तो सार्वजनिक रस्ता, वाहतूक व्यवस्था, पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि शहराच्या नियोजनाशी संबंधित आहे. त्यामुळे कारवाई करताना छोटा-मोठा, गरीब-श्रीमंत किंवा व्यावसायिक-सामान्य नागरिक असा भेद न करता नियम सर्वांसाठी समान असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विशेषतः रस्त्याच्या वापरासाठी अडथळा निर्माण होत असेल किंवा विनापरवानगी बांधकाम झाले असेल, तर संबंधित नियमांनुसार तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
मनपा आयुक्त आदित्य जीवने पदभार घेतल्यापासून त्यांच्या कार्यकाळात शहरातील विविध प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून हालचाली होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे मानराज पार्क परिसरातील या प्रकरणाचीही प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी, संबंधित परवानग्या व कागदपत्रांची पडताळणी करावी आणि नियमभंग आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरात अतिक्रमणविरोधी कारवाईबाबत वारंवार नोटिसा दिल्या जातात; मात्र त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई किती होते, हा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे नोटीस बजावणे हा केवळ पहिला टप्पा असून, नियमभंग सिद्ध झाल्यास पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, अशी नागरिकांची भूमिका आहे. मानराज पार्क परिसरातील या दोन आस्थापनांच्या प्रकरणातही महापालिका प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“कायद्याची अंमलबजावणी रस्त्यावरील छोट्या विक्रेत्यापासून मोठ्या व्यावसायिक आस्थापनापर्यंत समान पद्धतीने झाली पाहिजे,” अशी अपेक्षा व्यक्त करत संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.