ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” भाच्यानेच केला घातक कट! ८५ वर्षीय मामीचा खून; ३५ दिवसांनी गूढ उकल!

ज्याला मुलगा मानलं त्यानेच विश्वासघात केला; ८५ वर्षीय मामीच्या खुनाने पारोळ्यात खळबळ


जळगाव :  अपत्य नसल्याने ज्या भाच्याला मुलाप्रमाणे मानले, वेळोवेळी आर्थिक मदत केली, त्याच भाच्याने वृद्धेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करंजी, ता. पारोळा येथील वैजयंती गणपत माळी (वय ८५) यांच्या खुनाची उकल जळगाव पोलिसांनी तब्बल ३५ दिवसांच्या तपासानंतर केली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत उत्तम माळी याला पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी धुळे येथून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत खुनाची धक्कादायक माहिती समोर आली असून, १३ सप्टेंबर रोजी त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला.

वैजयंती माळी या पतीच्या निधनानंतर करंजी येथे एकट्याच राहत होत्या. ३ ऑगस्ट २०२६ रोजी त्या घरातून बेपत्ता झाल्या. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली. तपासादरम्यान १९ ऑगस्ट रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास सुरू असताना वैजयंती माळी यांचा सख्ख्या बहिणीचा मुलगा प्रशांत उत्तम माळी हादेखील घटनेनंतर अचानक गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तपासाची दिशा प्रशांतच्या हालचालींकडे वळली.

वैजयंती यांना स्वतःची अपत्ये नसल्याने त्या प्रशांतला मुलाप्रमाणे मानत असल्याचे तपासात समोर आले. त्या वेळोवेळी त्याला आर्थिक मदतही करत होत्या. मात्र, प्रशांतवर एचडीएफसीचे कर्ज तसेच इतर उधारी असल्याने वैजयंती यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर त्याची नजर असल्याचा संशय पोलिसांच्या तपासात पुढे आला.

पोलिसांनी करंजी व परिसरातील CCTV फुटेजची बारकाईने तपासणी केली. ३ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजता प्रशांत करंजी गावात आल्याचे फुटेजमधून स्पष्ट झाले. त्याचबरोबर एका CCTV फुटेजमध्ये वैजयंती माळी घाईघाईने जाताना आणि त्यानंतर एका कारमध्ये बसताना दिसून आल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली.

यानंतर पोलिसांनी प्रशांतचा शोध सुरू केला. तो तब्बल ३५ दिवस पोलिसांना गुंगारा देत फरार राहिला. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि १२ सप्टेंबर रोजी धुळे येथून त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांतने वैजयंती माळी यांना त्यांच्या साडूच्या वडिलांचे निधन झाल्याचे खोटे सांगितले. अंत्यविधीसाठी शिरसोली येथे घेऊन जाण्याच्या बहाण्याने त्याने त्यांचा विश्वास संपादन केला.

यानंतर त्याने वैजयंती यांच्याकडे दागिन्यांची मागणी केल्याचे तपासात समोर आले. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. त्यानंतर प्रशांतने त्यांना गाडीतच मुकटी, धुळे परिसरात नेले. तेथे त्याने त्यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

खून केल्यानंतर त्याने वैजयंती यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून तो मुकटी येथील घरी गेला आणि रात्री तेथेच झोपला. दुसऱ्या दिवशी दिवसभर मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावायची याचा शोध घेत फिरत राहिल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, त्याने दुपारी एका सोनाराकडे दागिने विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर रात्रीच्या वेळी बायपास हायवे परिसरातील ड्रेनेज पट्टीच्या सिमेंटच्या गॅपमध्ये मृतदेह टाकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

संशयित प्रशांत माळी याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी संबंधित ठिकाणी शोधमोहीम राबवली. यावेळी मोठ्या प्रमाणात कुजलेले मानवी अवशेष व सांगाडा आढळून आला. त्यामुळे वैजयंती माळी यांच्या बेपत्ता प्रकरणाला खुनाचे स्वरूप असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

मृतदेहाची ओळख आणि इतर बाबींची अधिकृत प्रक्रिया तपास यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणात सुरुवातीपासून पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. वृद्ध महिला बेपत्ता झाल्यानंतर तिचा ठावठिकाणा नसणे, संशयिताचा अचानक गायब होणे आणि तब्बल ३५ दिवस त्याचा शोध घेणे, या पार्श्वभूमीवर पोलिसांनी CCTV फुटेज, मानवी गुप्तवार्ता आणि तांत्रिक तपासाचा आधार घेत तपास पुढे नेला. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताला धुळे येथून ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्या चौकशीतून खुनाचा उलगडा झाला. संशयिताच्या सांगण्यावरून मानवी अवशेषही शोधण्यात पोलिसांना यश आले.

जळगाव पोलिसांच्या चिकाटी, सातत्यपूर्ण तपास, मानवी गुप्तवार्ता आणि तपास कौशल्यामुळे ८५ वर्षीय वैजयंती माळी यांच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ अखेर ३५ दिवसांनी उकलले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button