Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

गणपती विसर्जन मिरवणुकीला जाण्यास पालकांनी मनाई केल्याने घरातच घेतला टोकाचा निर्णय ! सहावीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू


दि.२० चोपडा :चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सहावी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीला जाण्यास पालकांनी परवानगी न दिल्याने मुलगा नाराज झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाला गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र, पालकांनी त्याला मिरवणुकीला जाण्यास मनाई केली. त्यानंतर तो नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळाने घरातील एका ठिकाणी तो गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याचा मृत्यू झाला.

पालकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित मुलगा मोबाईलवर वारंवार रील्स पाहत असे. मात्र, त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण काय होते, याबाबत कोणताही निष्कर्ष काढणे सध्या घाईचे ठरू शकते. या घटनेची पोलीस चौकशी सुरू आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अ.मृ. रजि. क्र. ४८/२०२६ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलाच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, अशा प्रसंगी मुलांच्या भावनिक अवस्थेकडे पालकांनी आणि कुटुंबीयांनी विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button