ताज्या बातम्या

शाहू नगरपासून मनपाच्या धुरळणी व फवारणी मोहिमेला प्रारंभ; डासजन्य रोगांवर नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज!

डासजन्य रोगांविरुद्ध मनपाची मोहीम सुरू; सर्व प्रभागांत टप्प्याटप्प्याने धुरळणी


प्रतिनिधी  : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच इतर डासजन्य रोगांचा वाढता धोका लक्षात घेऊन जळगाव महानगरपालिकेच्या मलेरिया विभागाने व्यापक प्रतिबंधात्मक मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी शाहू नगर या दाट लोकवस्तीच्या परिसरातून करण्यात आला असून शहरातील सर्व प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने धुरळणी (Fogging), कीटकनाशक फवारणी आणि लार्विसाइडिंगची कामे राबविण्यात येणार आहेत.

शाहू नगर परिसरात एकाचवेळी चार धुरळणी यंत्रांच्या साहाय्याने धुरळणी करण्यात आली. पावसामुळे पाणी साचण्याची शक्यता आणि दाट लोकवस्तीचा विचार करून या भागाची निवड करण्यात आली. आगामी काही दिवसांत पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार शहरातील प्रत्येक प्रभागात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या मलेरिया विभागाने या मोहिमेसाठी आवश्यक मनुष्यबळ, धुरळणी यंत्रे तसेच कीटकनाशके आणि लार्विसाइड रसायनांचा पुरेसा साठा उपलब्ध करून संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, नाले, गटारे, पाणी साचणारी ठिकाणे, दाट लोकवस्तीचे भाग आणि डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या परिसरांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

डासांच्या अळ्यांचा नाश करण्यासाठी लार्विसाइडचा वापर केला जात असून प्रौढ डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नियमित धुरळणी व कीटकनाशक फवारणी केली जाणार आहे. या उपाययोजनांमुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया यांसारख्या डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

महानगरपालिका आयुक्तांनी सांगितले की, “पावसाळ्यात डासजन्य रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे मलेरिया विभागामार्फत संपूर्ण शहरात नियोजनबद्ध पद्धतीने धुरळणी, फवारणी व लार्विसाइडिंगची मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी घराच्या व परिसरातील पाणी साचू देऊ नये, स्वच्छता राखावी आणि महानगरपालिकेच्या या मोहिमेस सहकार्य करावे.”

दरम्यान, मलेरिया विभागाने नागरिकांना घराभोवती किंवा छतावर पाणी साचू न देणे, पाण्याच्या टाक्या व भांडी झाकून ठेवणे, आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळणे तसेच डासांची उत्पत्ती होईल अशा टाकाऊ वस्तूंची तात्काळ विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातूनच डासजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button