बातमीचा इम्पॅक्ट : शहरातील गिरणा टाकी परिसरातील गुजरातवाला स्वीट ने स्वतःहून हटवले अतिक्रमण; आयुक्त आदित्य जीवने यांची समान न्यायाची भूमिका
गिरणा टाकी परिसरातील अतिक्रमण अखेर हटले; आयुक्त यांनी दाखवून दिले—‘नियम सर्वांसाठी समान!’
प्रतिनिधी : जळगाव शहरात गिरणा टाकी परिसरातील अतिक्रमणासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत अखेर जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रशासनाने संबंधित अतिक्रमण धारकाला नोटीस बजावून समज दिली होती. त्या अनुषंगाने संबंधित वाणिज्य वापर करणाऱ्याने स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, ‘बातमीचा इम्पॅक्ट’ पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
गिरणा टाकी परिसरातील सामाईक जागा व पार्किंगच्या वापराबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. या संदर्भातील अतिक्रमण आणि अनधिकृत वापराबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मनपा प्रशासनाने याची दखल घेत प्रत्यक्ष कारवाई केली.
मनपा आयुक्त आदित्य जीवने यांनी शहरातील अतिक्रमण आणि नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये कोणालाही झुकते माप न देता समान निकषाने कारवाई केली जाईल, हा संदेश या कारवाईतून दिला आहे. नियम सर्वांसाठी समान असून, प्रभावशाली व्यक्ती असो किंवा सामान्य नागरिक—नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई होणार, अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे. शहरातील विविध भागांमध्ये पार्किंगच्या जागेचा गैरवापर, रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणे तसेच सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करण्याच्या तक्रारी वाढत असताना गिरणा टाकी परिसरातील कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, नागरिकांच्या प्रश्नांना प्रसिद्धी माध्यमातून वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणे, हीच लोकशाहीतील माध्यमांच्या भूमिकेची ताकद आहे. गिरणा टाकी परिसरातील कारवाईमुळे संबंधित नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
मनपा प्रशासनाने यापुढेही शहरातील अशाच प्रकारच्या अतिक्रमणांवर सातत्याने आणि समान पद्धतीने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.