महानगरपालिकेतील सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त(आरोग्य विभाग) यांच्या नियुक्तीपासूनच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी करा; जिल्हाधिकाऱ्यांचे मनपा आयुक्तांना आदेशाचे पत्र
जळगाव : सामाजिक व आरटीआय कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी जळगाव शहर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाशी संबंधित कामकाजाबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. नाटेकर यांनी सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्तांच्या (आरोग्य विभाग) नियुक्तीच्या दिनांकापासून ते आज पर्यंतच्या कार्यालयीन व प्रशासकीय कामकाजाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती.
या संदर्भातील अर्जावर कार्यवाही करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जळगाव महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रात सदर प्रकरणाची आपल्या स्तरावरून सविस्तर चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, अर्जदाराला केलेल्या कार्यवाहीबाबत कळवावे आणि चौकशी/कार्यवाहीची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पत्रात अनिल नाटेकर यांच्या २५ जून २०२६ रोजीच्या अर्जाचा तसेच २२ जुलै २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अर्जाचा संदर्भ देण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी आता मनपा आयुक्तांच्या स्तरावर होणार असल्याने पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.