मेहरूण तलावात सांडपाणी रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना; गणेश विसर्जनापूर्वी दोन पंप हाऊस सुरू करण्याच्या सूचना
जळगाव, दि. १२ :जळगाव शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तलावात शहरातील गटारीचे सांडपाणी जाऊ नये, यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्याबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
उपमहापौर मनोज सुरेश चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेवक नितीनभाऊ सपके, नगरसेविका वैशालीताई पाटील, नगरसेवक अमरकाका जैन आणि नगरसेवक डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. मेहरूण तलावात एक-दोन नव्हे, तर तब्बल १६ ड्रेनेजमधून सांडपाणी जात असल्याची बाब बैठकीत समोर आली. त्यामुळे सांडपाण्याचा प्रवाह कायमस्वरूपी थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आगामी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दोन पंप हाऊस तातडीने सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी संबंधित ठेकेदाराने सांडपाणी तलावात जाण्यापासून रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची ब्ल्यू प्रिंट सादर केली. सांडपाण्याचा प्रवाह वळविणे, आवश्यक ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणे आणि तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रस्तावित कामांचे नियोजन याबाबत माहिती देण्यात आली.
मेहरूण तलाव हा शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा जलस्रोत असून, त्यात गटारीचे पाणी सोडले जाणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली. सांडपाण्याची समस्या केवळ तात्पुरती न सोडविता कायमस्वरूपी दूर करण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. ठेकेदाराने विलंब न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, तसेच कामाची गुणवत्ता आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण होते की नाही, यावर महापालिका प्रशासनाने काटेकोर देखरेख ठेवावी, असे उपमहापौर मनोज चौधरी यांनी निर्देश दिले.
“मेहरूण तलावाचे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय आहे. केवळ कागदोपत्री उपाययोजना नको, तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे. तलावात सांडपाणी जाणार नाही, यासाठी तातडीने ठोस व्यवस्था उभी करावी. याबाबत आयुक्तांशीही चर्चा करण्यात येईल,” असे उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी सांगितले.
मेहरूण तलाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.