जळगावच्या शाश्वत विकासाला ‘क्लायमेट’चा आधार; ‘हरित जळगाव’ अभियानाचा शुभारंभ
Climate Action Plan व Heat Action Plan प्रकाशित; १९ प्रभागांत वृक्षारोपण, २२ सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे; आरोग्य विभागाच्या सहा वाहनांचे लोकार्पण
प्रतिनिधी जळगाव, दि. १० : वाढत्या तापमानासह हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जळगाव शहराच्या शाश्वत विकासाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जळगाव शहर महानगरपालिका आणि महिला हौसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Climate Action Plan’ आणि ‘Heat Action Plan’चे प्रकाशन, तसेच ‘हरित जळगाव’ संकल्पनेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शहरातील १९ प्रभागांत सकाळी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर टी.एम. नगर येथील नक्षत्र गार्डन आणि मियावाकी गार्डनमध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
नियोजन भवन येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात ‘Climate Action Plan’ व ‘Heat Action Plan’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार २२ सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे, मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच राज्य शासनाकडून प्राप्त रोड स्विपिंग मशीनसह आरोग्य विभागाच्या सहा वाहनांचे उद्घाटन करण्यात आले.
‘हरित जळगाव’ केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित नको : आयुक्त मनपा आयुक्त आदित्य जिवने यांनी दोन्ही आराखडे जळगावच्या भविष्यातील नियोजनाचा आधार ठरावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘हरित जळगाव’ ही केवळ वृक्षारोपणाची मोहीम नसून शहराच्या नियोजनाचा अविभाज्य भाग असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.पाणी, ऊर्जा, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, हरित क्षेत्र, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी पायाभूत सुविधांचा एकत्रित विचार करून नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“Heat हा केवळ उष्णतेचा विषय नाही,” असे सांगत त्यांनी उष्णतेचा परिणाम आरोग्यासोबतच पाणी, ऊर्जा, रोजगार आणि शहरातील दैनंदिन जीवनावरही होत असल्याचे नमूद केले. शहरातील प्रत्येक भागावर उष्णतेचा परिणाम समान नसल्याने प्रभागनिहाय नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यात २५ लाख वृक्षलागवडीचा निर्धार करण्यात आल्याचे सांगितले. वाढत्या तापमानामुळे ‘अर्बन हीट’ची समस्या गंभीर होत असून, वृक्षलागवडीबरोबरच लावलेल्या झाडांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार सुरेश भोळे यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण करून लावलेल्या झाडाचा दरवर्षी ‘वाढदिवस’ साजरा करण्यासारखे उपक्रम राबवावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक करत “झाडे लावा आणि त्यांचे संगोपन करा,” असे आवाहन केले.
मंत्री गिरीश महाजन यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपत्रे आणि गणवेश वाटपाच्या उपक्रमाचे स्वागत केले. जळगाव शहर स्वच्छ ठेवण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.‘हर घर तिरंगा’ अभियानात नागरिकांनी सहभागी होऊन प्रत्येक घरावर तिरंगा फडकवावा, असे आवाहनही त्यांनी केले. विकास आणि आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेसोबत पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापौर दीपमाला काळे यांनी महिला हौसिंग ट्रस्टच्या सहकार्याने महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश दामू भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जिवने, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
‘हरित जळगाव’ ही केवळ मनपाची मोहीम नसून शहरातील प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. वृक्षारोपणासोबतच त्यांचे संगोपन आणि पर्यावरणपूरक नागरी नियोजनाला प्राधान्य देत जळगावला अधिक स्वच्छ, हिरवे आणि हवामान-सक्षम शहर बनविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.