आयआयटी, स्पर्धात्मक परीक्षांत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा महापौरांच्या हस्ते गौरव
जळगाव : आयआयटी तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून जळगाव शहराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर कार्यालयात मंगळवार (दि. ७ जुलै) रोजी विशेष सत्कार करण्यात आला. महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक व पेन भेट देत त्यांचा गौरव करण्यात आला.
महापौर कार्यालयात आयोजित या कौतुक सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि यशाचे कौतुक करण्यात आले. आयआयटी व विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेल्या ईशान डहाके, अथर्व चव्हाण, सारंग वाणी, भक्ती मकवाना, प्रांजल चौधरी आणि मेघा सपकाळे या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. शिक्षिका स्नेहल वाणी यांच्यासह इतर मार्गदर्शक शिक्षकांचा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. “यश हे सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाचे फळ असते. विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे यश संपादन करून जळगावचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल करावे आणि राष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे,” असे त्या म्हणाल्या.
या प्रसंगी उपस्थितांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महापौर कार्यालयात झालेल्या या प्रेरणादायी सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.