ताज्या बातम्या

जळगाव शहरातील नवीन बसस्थानकातील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस; सराईत आरोपी जेरबंद, १६ हजारांची रोकड हस्तगत !


जळगाव : नवीन बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या हातातील रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याच्या गुन्ह्याचा जिल्हापेठ पोलिसांनी छडा लावला असून, ६० वर्षीय सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून १६ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.४५ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान नवीन बसस्थानक परिसरात एक अनोळखी व्यक्तीने फिर्यादीच्या ताब्यातील २२ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेली होती. याप्रकरणी फिर्यादीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१५/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्हापेठ पोलिसांना आरोपीचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यासह पोलिसांचे गोपनीय माहितीचे जाळे सक्रिय केले. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून संशयित आरोपी भिकन पंडित शर्मा (वय ६०, रा. तलाव गल्ली, पारोळा) याचा ठावठिकाणा निष्पन्न झाला. पोलिसांनी त्याला भाजी गल्ली परिसरातून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या ताब्यातून १६ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

पोलिसांच्या नोंदीनुसार आरोपी भिकन शर्मा याच्याविरुद्ध यापूर्वी चोपडा शहर, पारोळा आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यांत एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये भादंवि कलम १७०, ३९२, ४१९, ४२०, ३४ आदी कलमांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात अनिल वाघ, महेश महाजन, नरेश सोनवणे, तेजस मराठे, दीपक पाटील, प्रवीण जाधव, समाधान पाटील, प्रशांत लाड, कमलाकर बडगुजर, अजय आहिरे यांचा समावेश होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button