जळगाव पोलिस दलाचा श्वान ‘धुरंधर’ राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी रवाना..
जळगाव जिल्हा पोलिस दलातील ‘धुरंधर’ या बेल्जियन मालिनोज जातीच्या श्वानाची गुन्हे शोधक (Crime Detection) प्रशिक्षणासाठी निवड झाली असून तो हरियाणातील पंचकुला येथील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांच्या (ITBP) राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्रात रवाना होत आहे.
10 नोव्हेंबर 2025 रोजी जन्मलेल्या धुरंधरचे वय सध्या 7 महिने 9 दिवस असून त्याला 9 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान पहिले तीन महिने आज्ञापालन (Obedience) आणि शिस्तीचे प्रशिक्षण दिले जाईल, तर पुढील सहा महिन्यांत वास ओळखणे, गुन्हेगारांचा माग काढणे, ओळख परेड, ट्रॅकिंग, ड्रॉप अँड फाइंड यासह विविध गुन्हे शोधक कौशल्ये विकसित केली जातील.
धुरंधरसोबत प्रथम हस्तक एचसी 2988 भट्टू पाटील आणि द्वितीय हस्तक पीसी 1167 हंसराज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पंचकुला (भानू) येथील ITBP चे नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग्ज अँड ॲनिमल्स (NTCD&A) हे देशातील अग्रगण्य श्वान प्रशिक्षण केंद्र मानले जाते. येथे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसह विविध राज्यांच्या पोलिस दलांतील श्वानांना बॉम्ब शोध, अंमली पदार्थ शोध, ट्रॅकिंग, दहशतवादविरोधी कारवाया तसेच वन्यजीव तस्करीविरोधी मोहिमांसाठी अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाते.
धुरंधरचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जळगाव पोलिसांच्या गुन्हे उकल क्षमतेत भर पडण्यास मदत होणार असून गंभीर गुन्ह्यांच्या तपासात त्याची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.