Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

जळगावात धोकादायक बॅनरबाजी सुरूच; मनपाच्या सूचनांकडे दुर्लक्ष, वीज खांबावर डीपीजवळही जीवाची परवा न करता होर्डिंग लावताना कामगार..

धोकादायक बॅनरबाजीचा कहर; मनपाच्या आदेशांकडे दुर्लक्ष


जळगाव : संभाव्य अतिवृष्टी, पावसाळी वादळी वारे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेने होर्डिंगधारकांना स्पष्ट सूचना दिल्या असतानाही शहरात नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः बसस्थानकासमोरील विद्युत खांबावरील डीपीजवळच बॅनर लावण्यात आल्याने नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

मनपाने दिलेल्या सूचनांनुसार, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या जवळ कोणतेही बॅनर लावू नयेत, फाटलेले बॅनर तात्काळ काढावेत तसेच होर्डिंग संरचना मजबूत ठेवावी, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र प्रत्यक्षात या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, काही एजन्सींकडून धोकादायक ठिकाणीही बॅनरबाजी सुरूच आहे.
बसस्टँड परिसरात डीपीजवळ लावण्यात आलेले बॅनर वादळी वाऱ्यात फाटल्यास किंवा सैल झाल्यास विद्युत पुरवठ्यावर परिणाम होण्याची तसेच शॉर्टसर्किट, आग किंवा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महानगरपालिकेने कठोर इशारा देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर परवाना रद्द करून होर्डिंग हटवण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तरीही अशा प्रकारे जीविताला धोका निर्माण करणाऱ्या बॅनर एजन्सींवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांकडून आता अशा बेजबाबदार एजन्सींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button