जळगाव जिल्ह्यात वाढत्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी.
जळगाव प्रतिनिधी | दि. १० सप्टें | जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यात वाढत्या आत्महत्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. दक्षा फाउंडेशन, जळगाव आणि भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, जळगाव यांना देण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून आत्महत्यांच्या घटना चिंताजनक प्रमाणात घडत आहेत. हा प्रश्न केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरता मर्यादित न ठेवता त्याकडे सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आत्महत्या प्रतिबंधासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र आत्महत्या प्रतिबंध समिती स्थापन करावी, शाळा-महाविद्यालये तसेच ग्रामीण भागात जनजागृती आणि समुपदेशनाचे कार्यक्रम नियमितपणे राबवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गरजू नागरिकांना सहज उपलब्ध होईल अशी प्रभावी समुपदेशन व हेल्पलाइन व्यवस्था निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक तसेच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या नागरिकांसाठी विशेष प्रबोधन आणि मानसिक आधार व्यवस्था उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीला वेळेवर मदत मिळण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, सामाजिक संस्था, समुपदेशक आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय साधून जिल्हास्तरीय प्रभावी कृती आराखडा तयार करावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.
“आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही; योग्य वेळी मिळालेला आधार एखाद्याचे जीवन वाचवू शकतो,” या भावनेतून समाजातील प्रत्येक घटकाने आत्महत्या प्रतिबंधासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दक्षा फाउंडेशन आणि भाजप जळगाव महानगरच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रशासनाने या गंभीर सामाजिक प्रश्नाची तातडीने दखल घेऊन जळगाव जिल्ह्यात आत्महत्या प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलावीत आणि जिल्ह्याला या क्षेत्रात आदर्श जिल्हा बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदन देताना सोबत तृषाल सोनवणे सतीश महाजन राजू डोंगरे कमलेश डांबरे हरिओम सूर्यवंशी बबलू सपकाळे सौ पेंढारकर आदि उपस्थित होते