ताज्या बातम्या

पानवेल उत्पादक शेतकऱ्यांचे शासनाला निवेदन; मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा


जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील पानवेल (नागवेल) उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे विविध मागण्यांसाठी निवेदन सादर केले असून, 20 दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास यापूर्वीच्या आंदोलनापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्यासोबत शेतकऱ्यांनी चर्चा केली असून लवकरच पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले आहे.

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागाकडे वेळोवेळी निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. पानवेल (Betel Vine) या बहुवार्षिक पिकाचा कोणत्याही शासकीय पिक वर्गवारीत समावेश नसल्यामुळे पिकविमा, नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई, कर्जपुरवठा व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी पानवेल पिकाचा औषधी पिकांमध्ये समावेश करणे, रोजगार हमी योजनेचा लाभ देणे, नैसर्गिक आपत्ती व पिकविमा संरक्षण लागू करणे, शेडनेटसाठी 100 टक्के अनुदान देणे तसेच पानमळ्यांवरील ‘मर’ रोगावर उच्चस्तरीय संशोधन करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून पानवेल पिकाची लागवड होत असताना अद्याप या पिकाची शासकीय नोंद नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागण्यांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशारा पानवेल उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button