Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

सिंहस्थ कुंभमेळ्यातील कथित बनावट कार्यादेशांची CBI चौकशी करा; छत्रपती शिवाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


जळगाव, दि. १२ : सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित विकासकामांच्या नावाने कथित बोगस व बनावट कार्यादेश तयार केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोमार्फत (CBI) स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

याबाबत संघटनेचे सचिव यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे निवेदन सादर केले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रासह देशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेला महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित विकासकामांच्या नावाने कथित बनावट कार्यादेश तयार करून शासनाची किंवा प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असल्यास, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

जळगाव येथे दि. १० ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत या कथित प्रकरणासंदर्भात गंभीर आरोप करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. विविध विकासकामांच्या नावाने बोगस अथवा बनावट कार्यादेश तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित कार्यादेशांवरील स्वाक्षऱ्याही बनावट असल्याचा दावा संघटनेने केला आहे. विशेषतः वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तथा विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावाचा किंवा स्वाक्षरीचा गैरवापर करून त्यांना संशयाच्या भोवऱ्यात आणण्याचा प्रयत्न झाला आहे का, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या कथित प्रकरणामागे कोणते राजकीय, प्रशासकीय किंवा अन्य हितसंबंध कार्यरत आहेत, बनावट कार्यादेशांची निर्मिती कोणी केली, त्यांचा प्रसार व वापर कोणत्या उद्देशाने करण्यात आला, तसेच या संपूर्ण प्रकारात कोणाची भूमिका आहे, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.केवळ प्रशासकीय चौकशीपुरते प्रकरण मर्यादित न ठेवता स्वतंत्र आणि उच्चस्तरीय तपास यंत्रणेमार्फत सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या आयोजनात शासनाचा निधी, प्रशासनाची विश्वासार्हता आणि भाविकांच्या सुविधांशी संबंधित कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाऊ नये. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची स्वतः दखल घेऊन CBI चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केली आहे.

दरम्यान, या आरोपांची सत्यता अधिकृत तपासातून स्पष्ट होणे आवश्यक असून, कथित बनावट कार्यादेश, स्वाक्षऱ्या आणि संबंधित कागदपत्रांची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button