बालनिकेतन विद्या मंदिर शाळेच्या परिसरातील धोकादायक पुलाची उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून पाहणी; तातडीच्या दुरुस्तीचे आदेश
प्रतिनिधी जळगाव : शहरातील रामानंद नगर परिसरातील बालनिकेतन विद्या मंदिर शाळेच्या नाल्यावर असलेल्या धोकादायक पुलाची उपमहापौर मनोज चौधरी यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला. पुलाची अत्यंत दुरवस्था आणि शाळेजवळील तुटलेली संरक्षण जाळी पाहता कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाला दिले.
पाहणीदरम्यान पुलावरील संरचनात्मक स्थिती चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले. शाळेच्या बाजूने बसविण्यात आलेली सुरक्षेची जाळीही तुटलेल्या अवस्थेत असल्याने लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर धोका निर्माण झाला आहे.
बालनिकेतन विद्या मंदिरात एक हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी दररोज सुमारे ४०० ते ५०० विद्यार्थी शाळेत ये-जा करण्यासाठी याच पुलाचा वापर करतात. अशा परिस्थितीत पुलाची दुरवस्था कायम राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज चौधरी यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करून नवीन पूल तयार होईपर्यंत विद्यार्थी आणि पालकांनी या पुलाचा वापर टाळावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना पुलाची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.उपमहापौर मनोज चौधरी म्हणाले, ” की शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. धोकादायक पूल आणि तुटलेली संरक्षण जाळी यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी महापालिका प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”
स्थानिक नागरिक आणि पालकांनीही या पुलाची तातडीने दुरुस्ती किंवा नवीन पूल उभारण्याची मागणी केली असून, प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुरक्षित करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.