‘आता आमची सटकली’; शिक्षण, नोकरी आणि न्यायासाठी देशभरातील तरुण जंतरमंतरवर !’आता पावले चालती संसदेची वाट’; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा.
प्रतिनिधी: देशभरात विविध भरती परीक्षा आणि शैक्षणिक पेपरफुटीच्या घटनांमुळे तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. “आता माझी सटकली” हे चित्रपटातील गाजलेले वाक्य, आज अनेक बेरोजगार आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी तरुणांच्या मनातील भावना व्यक्त करत असल्याचे चित्र दिसत आहे.
शिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या संधी मर्यादित असणे, त्यातच वारंवार पेपरफुटीच्या घटना घडल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अनिश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारविरोधात विविध विद्यार्थी संघटना आणि युवक संघटनांनी दिल्लीतील जंतरमंतर परिसरात आंदोलन छेडले आहे. संबंधित प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, तसेच संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात विविध संघटना सहभागी होत असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे, पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे उपोषणही अनेक दिवसांपासून सुरू असून त्यावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. विविध क्षेत्रांतील मान्यवर, चित्रपट कलाकार आणि राजकीय पक्षांकडूनही या आंदोलनांना पाठिंबा व्यक्त केला जात आहे. देशभरातील तरुणांमध्ये वाढत असलेली नाराजी ही केवळ रोजगार किंवा एका परीक्षेपुरती मर्यादित राहिलेली नसून, शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासालाच तडा जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे “आता पावले चालती पंढरीची वाट” एवजी “आता पावले चालती संसदेची वाट” अशी भावना अनेक आंदोलनकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
दरम्यान, दिल्लीतील आंदोलनांची तीव्रता आणि युवकांचा वाढता सहभाग पाहता, देशातील सामाजिक व राजकीय वातावरण कोणत्या दिशेने जाईल, तरुणांचा आवाज शासन कितपत ऐकेल आणि पेपरफुटीच्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.