मनपातील पहिल्या कर्मचारी संघटनेची नवी कार्यकारिणी पदस्थ; मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला कर्मचारी संघटनेचे स्वप्न पूर्ण.
जळगाव : महानगरपालिका ,नगरपरिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र प्रदेश (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या जळगाव शहर महानगरपालिका शाखेच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण, सत्कार व फलक अनावरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कर्मचारी हित, संघटन बळकटी आणि महानगरपालिकेच्या विकासासाठी प्रशासन व कर्मचारी यांच्यात समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश (राजूमामा) भोळे होते, तर उद्घाटन महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सिंधुताई कोल्हे, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष प्रभाकर बाणासुरे, संघटनमंत्री बाळासाहेब भुजबळ, ज्येष्ठ कार्यकर्ते पी. जे. आप्पा पाटील तसेच जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी कर्मचारी संघटनांची जबाबदारी, प्रामाणिक सेवा, शिस्तबद्ध कामकाज आणि जनहिताला प्राधान्य देत प्रशासनाशी समन्वय राखून काम करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी शाखाध्यक्ष गौरव सपकाळे, कार्याध्यक्ष समीर बोरोले, सचिव गौरव पुराणिक, उपाध्यक्ष अतुल पाटील, सहसचिव महेश ठाकूर, मुख्य सल्लागार योगेश बोरोले, सल्लागार योगेश वाणी, कोषाध्यक्ष शुभम कोतकर, प्रसिद्धी प्रमुख आकाश जगताप, संघटक संजय ठाकूर, चंद्रशेखर तायडे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, महानगरपालिका कर्मचारी आणि भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन जळगाव शहर महानगरपालिका शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.