पारोळ्यात जुन्या भांडणातून मित्राने मित्राच्या पोटात चाकू खुपसला; तरुणाचा मृत्यू
पळसखेडे बु. शिवारातील धक्कादायक घटना; आरोपीचा शोध सुरू
प्रतिनिधी: पारोळा तालुक्यातील पळसखेडे बु. शिवारात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाले. आरोपीने तरुणाच्या पोटात चाकू खुपसल्याने मयूर दुर्वास पाटील याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (१० सप्टेंबर) दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास रवींद्र सुकदेव पाटील यांच्या शेताजवळ घडली.
याप्रकरणी मयूरचे वडील बाळू उर्फ दुर्वास भिका पाटील (वय ४५, व्यवसाय शेती, रा. पळसखेडे बु., ता. पारोळा) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, अंकुश नेहरू पाटील याच्यासोबत मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला. यावेळी अंकुशने त्याच्या पॅन्टच्या डाव्या खिशातून चाकू काढून मयूरच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मयूरचा मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. ३४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ११५(२), ३५२, ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रात्री ९.१५ वाजता दाखल झाला.
घटनेनंतर आरोपी अंकुश नेहरू पाटील हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि योगेश महाजन करीत आहेत. दरम्यान, पळसखेडे बु. परिसरात सध्या शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.