शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स समोरील ‘डबल’ दुकानाचे गूढ; मनपाकडे बांधकामाची परवानगीच नाही?
मनपाला माहिती नाही, मग हे बांधकाम कोणाच्या आशीर्वादाने?
जळगाव : शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि मुख्य शाखा स्टेट बँकेच्या रांगेतील दुकानांच्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. परिसरातील एका दुकानाची तोडफोड करून त्याठिकाणी नव्याने, तसेच पूर्वीच्या तुलनेत अधिक जागेत डबल मजली दुकान उभारण्यात आल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, या बांधकामासाठी जळगाव महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आल्याची नोंद उपलब्ध नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हे बांधकाम नियमबाह्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, संबंधित दुकानांसह या संपूर्ण रांगेतील दुकाने कायदेशीर आहेत की अतिक्रमण स्वरूपातील आहेत, याबाबतही नगररचना विभागाकडे स्पष्ट माहिती नसल्याची चर्चा आहे. जर विभागाकडेच या बांधकामांची अधिकृत माहिती नसेल, तर शहरातील बांधकाम नियंत्रण व्यवस्था नेमकी किती सक्षम आहे, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
शहरातील प्रमुख ठिकाणी सुरू असलेल्या अशा बांधकामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे का? परवानगी नसताना बांधकाम सुरू असेल तर त्यावर कारवाई का झाली नाही? तसेच संबंधित जागेची मालकी, मंजूर नकाशे आणि बांधकाम परवानग्यांची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी होत आहे.
नगररचना विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित दस्तऐवज सार्वजनिक करावेत आणि नियमभंग आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.