ताज्या बातम्या

जळगावात सिंगल यूज प्लास्टिकसह रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर मनपाची कारवाई.२२६ प्रकरणांत कारवाई; २ लाख ६९ हजार २० रुपयांचा दंड वसूल


जळगाव, दि. २ : शहरात सिंगल यूज प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणाऱ्या आस्थापनांसह सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील विविध भागांत तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत आतापर्यंत २२६ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, २ लाख ६९ हजार २० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्लास्टिक बंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांबरोबरच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवरही कारवाई करण्यात येत आहे.

शहरात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. तसेच नागरिकांनी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर तसेच नागरिकांविरुद्ध यापुढेही नियमितपणे दंडात्मक कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही कारवाई मनपा आयुक्त व उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी शाखा अभियंता (आरोग्य) समीर बोरोले, मुख्य स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील, रूपेश भालेराव, कुणाल बारसे, रमेश कांबळे तसेच स्वच्छता निरीक्षक मयूर सपकाळे, महेश ठाकूर, मंजू पवार, सिद्धार्थ घेंगट, उज्ज्वल बेंडवाल, विशाल वानखेडे, चेतन हातागडे, अजय चांगरे, तांबोळी आदी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button