जामटीत अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक, शिक्षक आरोपीची कार पेटवली
शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल; गावकऱ्यांची पोलिसांशी झटापट, दगडफेकीनंतर टिअर गॅस व सौम्य लाठीचार्ज
बोदवड : जामटी गावात क्लासच्या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा, अयोग्य मागणी केल्याचा तसेच तिला बळजबरीने कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता ६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रकरणाची माहिती गावात समोर आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांमध्ये मोठा रोष निर्माण झाला. काही ग्रामस्थांनी आरोपीच्या घराकडे धाव घेतली. यावेळी आरोपीच्या कारला आग लावण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी बोदवड पोलिस ठाण्यात आणले.
दरम्यान, आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत काही ग्रामस्थांनी पोलिसांना विरोध केला. यावेळी पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये झटापट झाली. परिस्थिती चिघळत असताना जमावाकडून तुरळक दगडफेकही झाल्याची माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी टिअर गॅसचे शेल फोडले तसेच सौम्य लाठीचार्ज केला.
या घटनेमुळे जामटी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या गावात शांतता आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांकडून संवेदनशीलतेने तपास सुरू आहे. आरोपीला न्यायालयाने ६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिल्याने या कालावधीत पोलिसांकडून घटनेबाबत अधिक तपास करण्यात येणार आहे. तसेच जामटीतील हिंसक प्रकारात सहभागी असलेल्या व्यक्तींचीही पोलिसांकडून माहिती घेतली जात असल्याची शक्यता आहे.