राहुल गांधींवरील एफआयआरविरोधात जळगावात काँग्रेस आक्रमक; काँग्रेस भवनासमोर जोरदार आंदोलन
जळगाव दि.१ सप्टें: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर उत्तराखंड सरकारने दाखल केलेल्या एफआयआरच्या निषेधार्थ जळगाव शहर व जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तराखंड सरकार तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्यावर दाखल करण्यात आलेला एफआयआर चुकीचा असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. देशात दलितविरोधी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभेनंतर मैदानाचे कथितरीत्या ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या प्रकारावरूनही काँग्रेसने आक्षेप घेतला. या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी राहुल गांधी यांनी या मुद्द्याला वाचा फोडल्यानंतर त्यांच्यावरच एफआयआर दाखल करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रदीप सोनवणे, शहर उपाध्यक्ष जगदीश गाढे, ब्लॉक अध्यक्ष अनंत परिहार, राहुल भालेराव, विशाल पवार, जाकिर बागवान, सागर सपके, प्रभाकर महाजन, मनोज चौधरी, अर्चना गाडे, अरुणा पाटील, छाया कोरडे, देवा ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.