ताज्या बातम्या

खडसेंच्या फार्महाऊसवरील ड्रोन निगराणीची चौकशी करा; राष्ट्रवादीचे निवेदन


जळगाव प्रतिनिधी : माजी मंत्री तथा विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसची ड्रोनद्वारे रेकी करण्यात आल्याच्या कथित प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच खडसे कुटुंबीयांना अतिरिक्त सुरक्षा पुरवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या वतीने करण्यात आली.

याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले. निवेदनानुसार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री मुक्ताईनगर येथील आमदार एकनाथराव खडसे यांच्या फार्महाऊस परिसरात ड्रोनद्वारे निगराणी करण्यात आल्याचा आरोप आहे. सुरक्षारक्षकांनी या ड्रोनचे व्हिडिओ चित्रीकरण मोबाईलमध्ये केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी आमदार एकनाथराव खडसे यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अद्याप जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ड्रोनद्वारे झालेल्या निगराणीची तातडीने चौकशी करून संबंधितांना अटक करावी आणि संपूर्ण खडसे कुटुंबीयांना अतिरिक्त सुरक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष राजुभाऊ मोरे, डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन, महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील माळी, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, सामाजिक न्याय विभागाध्यक्ष रमेश बारे, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, महानगर अध्यक्ष गिरीश सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, गणेशभाऊ पाटील, नईम खाटीक, रफीक पटेल आदी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button