अवैध सावकारीच्या जाचातून मुक्त होण्यासाठी पुढे या; सामाजिक कार्यकर्ते शशिकांत साळवेंचे नागरिकांना कायदेशीर मदतीचे आवाहन.
जळगाव : अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळलेल्या नागरिकांनी घाबरून न जाता कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत साळवे यांनी केले आहे. सावकारीच्या माध्यमातून जमीन, घर तसेच इतर मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न होत असल्यास संबंधितांनी पुढे येऊन कायदेशीर मार्गाने तक्रार दाखल करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
अवैध सावकारीच्या जाचाला त्रस्त असलेल्या नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन करून मदत केली जाईल. तसेच संबंधित प्रकरणात विविध कायदेशीर बाबींचा समावेश करून अवैध सावकारांविरुद्ध रीतसर तक्रार अर्ज तयार करून देण्यात येईल, अशी माहिती साळवे यांनी दिली असून ९५९५८६११४० किंवा ८९९९५३४५४० या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
दरम्यान, या आवाहनासोबत महाराष्ट्र शासनाच्या १६ सप्टेंबर २०१४ रोजीच्या असाधारण राजपत्रातील अधिसूचनेचा संदर्भ देण्यात आला आहे. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत विविध प्रकारच्या कर्जांसाठी शासनाने कमाल व्याजदर निश्चित केले आहेत. राजपत्रातील अधिसूचनेनुसार, शेतकऱ्यांना दिलेल्या तारण कर्जासाठी ९ टक्के, तर विनातारण कर्जासाठी १२ टक्के वार्षिक कमाल व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना दिलेल्या कर्जासाठी तारण कर्जावर १५ टक्के, तर विनातारण कर्जावर १८ टक्के वार्षिक कमाल व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
“तुम्ही, तुमचे नातेवाईक किंवा तुमचे मित्र अवैध सावकारीच्या जाचाने त्रस्त असतील, तर घाबरू नका. या जाचातून मुक्त होण्यासाठी संपर्क साधा,” असे आवाहन साळवे यांनी केले आहे. संबंधितांना कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांची या जाचातून सुटका करण्यासाठी मदत केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
राजपत्रातील कमाल वार्षिक व्याजदर :
– शेतकऱ्यांसाठी तारण कर्ज — ९ टक्के
– शेतकऱ्यांसाठी विनातारण कर्ज — १२ टक्के
– इतर व्यक्तींसाठी तारण कर्ज — १५ टक्के
– इतर व्यक्तींसाठी विनातारण कर्ज — १८ टक्के