कामगारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्जुन पवार यांच्यावर नवी जबाबदारी.लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
जळगाव : सामाजिक व कामगार क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटना, उत्तर महाराष्ट्र – जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कामगार, वंचित आणि दुर्बल घटकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची जबाबदारी आता पवार यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.
लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या ध्येय-धोरणांनुसार कामगारांच्या विविध समस्या प्रशासन व संबंधित यंत्रणांसमोर मांडणे, अन्यायग्रस्त कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे तसेच कामगारांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे, यासाठी पवार प्रयत्न करणार आहेत.
कामगार हा समाजव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असूनही वेतन, रोजगारातील असुरक्षितता, कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या समस्या, शासकीय योजनांचा लाभ आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध प्रश्नांना कामगारांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर कामगारांना संघटित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पवार यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
दरम्यान, अर्जुन पवार यांना लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेचे नियुक्तीपत्र प्रमुख उपस्थित रवींद्र महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पवार यांच्या नियुक्तीचे स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व कामगार क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जळगाव जिल्ह्यात संघटनेचा विस्तार करून कामगार तसेच वंचित घटकांपर्यंत संघटनेचे कार्य पोहोचविण्याचे आव्हानही पवार यांच्यासमोर असणार आहे. त्यांची नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली असून, त्यानंतर त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील कार्यकाळाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
अर्जुन पवार यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यात कामगारांच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.