विनापरवानगी स्मार्ट मीटर बसवल्याचा गंभीर आरोप; जुने पोस्टपेड मीटर पुन्हा बसविण्याची ग्राहकाची मागणी
पूर्वसूचना न देता मीटर बदलल्याचा दावा; अवाजवी वीजबिलाचा आरोप करत CGRF, ओम्बुड्समन व ग्राहक न्यायालयात जाण्याचा इशारा
प्रतिनिधी : महावितरण (MSEDCL) आणि M/s Adani Transmission Limited यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्राहकाची संमती न घेता जुने पोस्टपेड वीजमीटर काढून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप एका वीज ग्राहकाने केला आहे. अनिल नाटेकर असे त्यांचे नाव आहे ,या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून स्मार्ट मीटर तातडीने काढून पूर्वीचे पोस्टपेड मीटर पुन्हा बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ग्राहकाच्या म्हणण्यानुसार मीटर बदलण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही किंवा त्यांची संमती घेण्यात आली नाही. त्यामुळे हे कृत्य Central Electricity Authority (Installation & Operation of Meters) Regulations, 2006 तसेच ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तक्रारीत पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, केंद्र सरकारने प्रीपेड स्मार्ट मीटर अनिवार्य नसून ते ऐच्छिक असल्याचे संसदेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्राहकाच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविणे योग्य नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. याशिवाय, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी येणाऱ्या वीजबिलाच्या तुलनेत सध्याचे बिल अवाजवी असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदाराने संबंधित अधिकाऱ्यांकडे सात दिवसांच्या आत स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे पोस्टपेड मीटर पुन्हा बसविण्याची मागणी केली आहे. तसेच, संमतीशिवाय वीजपुरवठा खंडित करू नये, अशीही विनंती केली आहे.
मागणीची पूर्तता न झाल्यास CGRF (Consumer Grievance Redressal Forum), वीज ओम्बुड्समन आणि ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही तक्रारदाराने दिला आहे.