Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

जळगाव पोलिसांचे “ऑपरेशन ऑल आऊट” : एकाच दिवशी २,३७० हून अधिक कारवाया; ३४ बेपत्ता महिला शोधल्या, १,४४३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई.


जळगाव, दि. ६ : जळगाव जिल्हा पोलिस दलाने दि. ५ जून रोजी जिल्हाभरात “ऑपरेशन ऑल आऊट” ही विशेष मोहीम राबवत गुन्हेगारी, अवैध धंदे, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि समाजविघातक प्रवृत्तींविरोधात मोठी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी विविध कायद्यांतर्गत शेकडो गुन्हे दाखल करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दारूबंदी कायद्यांतर्गत सर्वाधिक १९६ गुन्हे नोंदविण्यात आले असून, यामध्ये ₹२१ लाख ६५ हजार ६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध ५६ गुन्हे दाखल करण्यात आले.

जुगार अड्ड्यांवर धाड टाकून ७६ गुन्हे नोंदविण्यात आले असून ₹४६ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात शस्त्र अधिनियम कलम ३/२५ व ४/२५ अंतर्गत ४ गुन्हे, तर अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरोधात १० एनडीपीएस गुन्हे दाखल करण्यात आले.

तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व वापरावर नियंत्रणासाठी COTPA कायद्यांतर्गत तब्बल २०३ गुन्हे नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे, विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या ३४ बेपत्ता महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.

सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकारांवर कारवाई करत कलम २८५ बीएनएस अंतर्गत २२ गुन्हे, संशयास्पद वास्तव्याबाबत कलम १२२/१२४ अंतर्गत ५ गुन्हे, तर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून कलम १२६ अंतर्गत २०१ आणि कलम १२९ अंतर्गत १७ व्यक्तींना बाँडवर घेण्यात आले.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कठोर कारवाई केली. १,४४३ वाहनचालकांवर कारवाई करून ९ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. याशिवाय मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या ३७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम कलम १४२ अंतर्गत ५ तडीपार आरोपींना पकडण्यात आले, तर फरार व वॉंटेड असलेल्या २ आरोपींना अटक करण्यात आली.

मोहीमेदरम्यान जिल्ह्यातील २०८ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित असलेले ४२ अटक वॉरंट (NBW) आणि ५२ जामीनपात्र वॉरंट (BW) बजावण्यात आले.

खनिज चोरी व पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या अवैध वाळू वाहतुकीविरोधातही कारवाई करत ६ गुन्हे दाखल करण्यात आले.

जळगाव जिल्हा पोलिसांनी राबविलेल्या या व्यापक मोहिमेमुळे अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि वाहतूक नियमभंग करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button