ताज्या बातम्या

स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; दोषींवर कठोर कारवाई होणार ! मनपा आयुक्त आदित्य जिवने (भा. प्र. से.)


जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम,प्रभावी आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जिवने (भा. प्र. से.) यांनी शुक्रवारी आरोग्य विभागाच्या कामकाजाची सखोल पाहणी करत शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष तपासणी केली. स्वच्छतेच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटदार संस्थांवर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला. पाहणीची सुरुवात टीबी सॅनिटोरियम परिसरातील बीव्हीजी कंपनीच्या वाहनतळापासून करण्यात आली. येथे कार्यरत व बंद अवस्थेतील स्वच्छता वाहनांची तपासणी करून त्यांच्या वापर, देखभाल आणि कार्यक्षमतेची माहिती आयुक्तांनी घेतली. याशिवाय वाहनतळ परिसरातील कचरा संकलन केंद्राच्या सुरू असलेल्या बांधकामाचीही त्यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

त्यानंतर आयुक्तांनी आदर्श नगर, इच्छादेवी परिसर, डी-मार्ट परिसर, गणेश कॉलनी, एम. जे. कॉलेज परिसर, सुभाष चौक, भिलपुरा चौक, नेरी नाका चौक तसेच शहरातील इतर महत्त्वाच्या भागांमध्ये प्रत्यक्ष फिरून स्वच्छतेची स्थिती तपासली. रस्त्यांवरील साफसफाई, कचरा संकलन, घंटागाड्यांची कार्यपद्धती आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता याचा त्यांनी आढावा घेतला.

भजे गल्ली परिसरात काही व्यावसायिकांनी दुकानाबाहेर कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी तत्काळ संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनीही आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यानंतर टीबी सॅनिटोरियम येथील ई-बस डेपो परिसरात जळगाव महानगरपालिकेच्या १९ प्रभागांतील १९ आरोग्य निरीक्षक तसेच बीव्हीजी कंपनीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची परेड घेण्यात आली. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत स्वच्छता मोहिम अधिक परिणामकारकपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक प्रभागात नियमित देखरेख, वेळेत कचरा उचल, स्वच्छता साधनांचा योग्य वापर आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. कामात कसूर करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी किंवा कंत्राटदारांना कोणतीही सवलत दिली जाणार नसून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. शहराची स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक संबंधित यंत्रणेची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी शहरातील कार्यरत खाजगी वेईंग ब्रिजची तसेच महानगरपालिकेच्या नव्याने सुरू होणाऱ्या घनकचरा प्रकल्पातील नवीन वजन काट्याचीही पाहणी करण्यात आली. कचरा व्यवस्थापनात पारदर्शकता व अचूकता राखण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी जळगाव घडविण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक जबाबदारीने, समन्वयाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करावे. नागरिकांच्या अपेक्षांनुसार सेवा देण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश आयुक्त आदित्य जिवने (भा. प्र. से.) यांनी या पाहणी दौऱ्यातून दिला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button