राष्ट्रीय महामार्गाचा फलक जळगावात… पण जबाबदारी जालना जिल्ह्यात..? नागरिकांनी न्यायासाठी जालना गाठायचे का..?मनसेचा संतप्त सवाल, सात दिवसांचा अल्टिमेटम
प्रतिनिधी: जळगाव शहरातील अजिंठा चौफुली ते सुप्रीम कॉलनी (एमआयडीसी मार्ग) या अपघातप्रवण मार्गावर तातडीने गतीरोधक, सूचना फलक, रोड मार्किंग आणि अन्य वाहतूक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन सादर केले आहे. मागण्यांकडे सात दिवसांत लक्ष न दिल्यास तीव्र लोकशाही आंदोलन उभारण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.
या निवेदनानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा काही भागच स्थानिक राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत असून, पुढील मार्गाची प्रशासकीय जबाबदारी जालना विभागाकडे आहे. त्यामुळे जळगाव शहरातील रस्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन पाठपुरावा करायचा का, असा प्रश्न उपस्थित करत मनसेने प्रशासनावर टीका केली आहे. मनसेच्या मते, एका शहरातील रस्ता आणि त्यावरील अपघातांची जबाबदारी दुसऱ्या जिल्ह्याच्या कार्यालयाकडे असणे ही गंभीर प्रशासकीय विसंगती आहे. याचा थेट फटका जळगावकरांच्या सुरक्षिततेला बसत असल्याचेही पक्षाने म्हटले आहे. अजिंठा चौफुली, कस्तुरी हॉटेल परिसर, आर.एल. चौफुली, पोलीस कॉलनी चौक, जळगाव वजन काटा आणि ममता बेकरी परिसरात भरधाव वाहनांमुळे नागरिकांना मोठा धोका निर्माण होत आहे. या मार्गावर वारंवार किरकोळ अपघात घडत असून, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
नागरिकांचा जीव धोक्यात गेल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी मनसेने केली आहे. यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासकीय अधिकारक्षेत्राबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले.
सात दिवसांच्या आत गतीरोधक, सूचना फलक, रोड मार्किंग आणि इतर सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन तीव्र लोकशाही आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा मनसेने दिला आहे.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, आशुतोष जाधव, चेतन पवार, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक, राजेश मराठे, खुशाल ठाकूर, शकील शेख, बादशाह शाह, दीपक राठोड, लक्ष्मी भील यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.