माणुसकीचा आदर्श! चोपडा शहर पोलिसांकडून कॅन्सरग्रस्त होमगार्ड अधिकारी रवींद्र पाटील यांना ₹२५ हजारांची आर्थिक मदत
प्रतिनिधी: चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावणारे होमगार्ड अधिकारी रवींद्र पाटील यांना चेहऱ्याच्या उजव्या बाजूला कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती समोर आल्यानंतर चोपडा शहर पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला.
पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या पुढाकाराने चोपडा शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी एकत्रितपणे ₹२५,००० ची आर्थिक मदत रवींद्र पाटील यांना सुपूर्द केली. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. रवींद्र पाटील यांनी चोपडा शहरात अनेक वर्षे होमगार्ड अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना गणेशोत्सव, विविध धार्मिक मिरवणुका, उत्सव, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या बंदोबस्तात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या निष्ठावान सेवेमुळे ते पोलीस दलात तसेच नागरिकांमध्येही परिचित आहेत.
त्यांच्या आजाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी संवेदनशीलता दाखवत सहकाऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले. त्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत उभी करून रवींद्र पाटील यांना उपचारासाठी दिली.
या प्रसंगी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी दाखविलेल्या या माणुसकीच्या भावनेचे सर्वत्र कौतुक होत असून, संकटकाळात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा हा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.