मनपा महासभेचा 2017-18 चा अविश्वास ठराव, वादग्रस्त नियुक्ती आणि आता सेवानिवृत्ती; उदय पाटील प्रकरण पुन्हा चर्चेत
प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी पदावरून काही वर्षांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्याविरोधात महासभेत अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्यांच्या जागी कनिष्ठ अभियंता असलेल्या उदय मधुकर पाटील यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यावेळी या निर्णयावरून मोठे राजकीय व प्रशासकीय वादंग निर्माण झाले होते.
उदय पाटील यांची नियुक्ती ही आरोग्य अधिकारी पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या निकषांविरोधात असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री कार्यालयासह विविध स्तरांवर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तक्रारदाराने महासभेच्या अविश्वास ठरावाचा आधार घेऊन वैद्यकीय पदवीधारक डॉ. विकास पाटील यांना पदावरून दूर करण्यात आल्याचा आरोप केला होता. तसेच राजकीय हस्तक्षेप, पदाचा गैरवापर आणि प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचाही दावा करण्यात आला होता.
तक्रारदाराने या तक्रारीत उदय पाटील यांच्या विविध पदांवरील कार्यकाळातील वादग्रस्त घटनांचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र या गंभीर आरोपांबाबत शासन किंवा संबंधित यंत्रणांनी कोणती चौकशी केली, त्याचा निष्कर्ष काय निघाला, अथवा आरोप फेटाळण्यात आले का, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती सार्वजनिकरीत्या समोर आलेली नाही.
विशेष म्हणजे, महासभेतील अविश्वास ठरावानंतर आरोग्य विभागाच्या नेतृत्वात झालेल्या बदलावरून त्या काळात मोठी चर्चा झाली होती. आता उदय पाटील आरोग्य अधिकारी व सहाय्यक आयुक्त या पदावरून ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असताना, त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींचे नेमके काय झाले, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
जर महासभेच्या अविश्वास ठरावानंतर झालेली नियुक्ती नियमसंगत होती, तर त्याबाबत अधिकृत स्पष्टीकरण का देण्यात आले नाही? आणि तक्रारींमध्ये तथ्य होते, तर त्यावर कारवाई का झाली नाही? असे प्रश्न नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे निवृत्तीपूर्वी या प्रकरणातील सत्यस्थिती समोर येणार का? नवनियुक्त मनपा आयुक्त आदित्य जीवने या प्रकरणात काय चौकशी करतात यावर जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
