चोपडा येथील पोक्सो प्रकरणात जन्मठेप; ११ वर्षीय मुलीवरील अत्याचार व हत्या केल्या प्रकरणी न्यायालयाने दिला विकृत मानसिकतेला कायद्याचा इशारा
महिला पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या भक्कम तपासामुळे आरोपीला जन्मठेप
प्रतिनिधी: 2024 मधील जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या २२ वर्षीय शेजाऱ्या राहणाऱ्या इसमा विरोधातील हा निकाल समाजासाठी मोठा संदेश मानला जात आहे.
मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ अमळनेर श्रीमती सी. व्ही. पाटील यांनी गुन्हा क्र. ४५४/२०२४ मध्ये आरोपीला दोषी ठरवत जन्मठेप आणि ₹३० हजार दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची तरतूदही करण्यात आली आहे. या प्रकरणात महिला पोलीस निरीक्षक कावेरी
कमलाकर यांनी केलेला तपास, तसेच सरकारी वकील श्री. के. आर. बागुल यांनी न्यायालयात मांडलेले ठोस पुरावे निर्णायक ठरले. “लास्ट सीन टुगेदर”, बाल साक्षीदारांची ओळख, डीएनए आणि फॉरेन्सिक अहवाल, रक्ताचे नमुने आणि पोस्टमॉर्टम अहवाल या सर्व पुराव्यांच्या साखळीमुळे आरोपीचा गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाला.
या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे की, अशा अमानुष कृत्यांमध्ये आरोपींना कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही. पोक्सो आणि बीएनएस अंतर्गत कठोर कारवाई होत असल्याने महिलांवरील आणि बालकांवरील गुन्ह्यांविरोधात न्यायव्यवस्था अधिक संवेदनशील आणि कठोर भूमिका घेत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
समाजात वाढत चाललेल्या विकृत प्रवृत्ती रोखण्यासाठी केवळ कायद्याची भीती पुरेशी नसून पालकांची जागरूकता, मुलांच्या सुरक्षिततेबाबत सतर्कता आणि समाजातील संवेदनशीलता वाढणेही तितकेच आवश्यक असल्याची भावना या निकालानंतर व्यक्त होत आहे.