वैद्यकीय बिलासाठी घेतली होती २ हजारांची लाच; १२ वर्षांनंतर वरिष्ठ सहायकाला शिक्षा
लाचेचा गुन्हा २०१४चा; शिक्षा २०२६ मध्ये! वरिष्ठ सहायकाला कारावास
नाशिक प्रतिनिधी : शासनाकडून मंजूर झालेल्या वैद्यकीय बिलाची रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर २ हजार रुपये स्वीकारणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर येथील वरिष्ठ सहायकाला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. ही कारवाई १६ सप्टेंबर २०१४ रोजी झाली होती, तर तब्बल १२ वर्षांनंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयाने शिक्षा सुनावली.
रामचंद्र नरसु माकरे, वरिष्ठ सहाय्यक, वर्ग-३, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर, नाशिक असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव होते.
तक्रारदाराचे शासनाकडील मंजूर वैद्यकीय बिलाचे पैसे बँक खात्यात जमा करण्यासाठी माकरे यांनी १६ सप्टेंबर २०१४ रोजी शासकीय पंचासमक्ष ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर २ हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील वैद्यकीय खर्च प्रतिकृती कक्षासमोरील हॉलमध्ये २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना माकरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकरणी १६ सप्टेंबर २०१४ रोजी सातपूर पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे गुन्हा क्रमांक ३०६९/२०१४ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर तपासी अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण करून ९ एप्रिल २०१५ रोजी मा. जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाचा स्पेशल केस क्रमांक १९/२०१५ असा होता.
सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित विनायक खारकर यांच्या समोर झाली होती. सुनावणीअंती न्यायालयाने रामचंद्र नरसु माकरे यांना दोषी ठरविले. न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत ६ महिने कारावास आणि १ हजार रुपये द्रव्यदंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास, तसेच कलम १३(२) अंतर्गत १ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी व कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस हवालदार प्रदीप काळोगे यांनी कामकाज पाहिले. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे व सचिन गोरवाडकर यांनी बाजू मांडली.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने अथवा त्यांच्या वतीने कोणत्याही खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी निर्भीडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
नाशिक : ०२५३-२५७५६२८, २५७८२३० | अहिल्यानगर : ०२४१-२४२३६७७ | धुळे : ०२५६२-२३४०२० | नंदुरबार : ०२५६४-२३०००९ | जळगाव : ०२५७-२२३५४७७ | टोल फ्री : १०६४ | नाशिक परिक्षेत्रीय कार्यालय व्हॉट्सअॅप : ९५४५६५१०६४