फैजपूर हद्दीतील अकलूदच्या तापी काठावरील घरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; ४ महिलांची सुटका
प्रतिनिधी : फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकलूद गावाच्या शिवारात तापी नदीच्या काठावरील एका दुमजली घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका केली. ही कारवाई गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालय, यावल पोलीस ठाणे आणि निंभोरा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.
या कारवाईत कुंटणखाना चालविणारी मनीषा प्रकाश झोपे (वय ४५, रा. अकलूद, ता. यावल) हिच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या चार महिलांपैकी तीन महिला मूळच्या पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथील असून सध्या भुसावळ येथे वास्तव्यास आहेत. एक महिला भुसावळ येथील स्थानिक रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांचे नियोजन ठरले निर्णायक
या कारवाईपूर्वी पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने माहितीची पडताळणी केली. कुंटणखान्यातील हालचालींची खात्री करण्यासाठी पोलिसांनी पंटर पाठवून माहिती मिळवली आणि त्यानंतर योग्य नियोजन करून छापा टाकला. त्यामुळे कारवाईदरम्यान संशयितांना सावध होण्याची संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे, तापी नदीच्या काठावरील या दुमजली घरात अनेक खोल्या तयार करण्यात आल्याचे पोलिसांच्या कारवाईत निदर्शनास आले. घराचा वापर नेमका कोणत्या पद्धतीने केला जात होता, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणामुळे अकलूद परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले असून, या कुंटणखान्याशी आणखी कोणाचा संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे.