Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

“एक संवाद… वाचवू शकतो एक जीव; जळगाव पोलिसांचे नागरिकांना भावनिक आवाहन”

"कोणीही एकटा नाही... संकटाच्या क्षणी जळगाव पोलीस तुमच्या मदतीसाठी तत्पर"


प्रतिनिधी दि. २६ : जळगाव जिल्ह्यात १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ४४३ आत्महत्यांची नोंद झाली असून, जिल्ह्यात दररोज सरासरी २ ते ३ आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव जळगाव पोलिसांनी केलेल्या सांख्यिकीय विश्लेषणातून समोर आले आहे. या प्रकरणांमध्ये ३८३ प्रौढ पुरुष, २९ महिला, ८ अल्पवयीन मुलं आणि ११ अल्पवयीन मुली यांचा समावेश आहे. या कालावधीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांच्या आकडेवारीनुसार MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ३१ आत्महत्या झाल्या असून त्यापाठोपाठ पारोळा (२८), अमळनेर (२३), जळगाव तालुका (२२), भडगाव (२१), मेहुणबारे (१९), पहूर (१८) आणि रामानंद नगर (१८) या पोलीस ठाण्यांचा क्रमांक लागतो. तर सावदा (१), जिल्हापेठ (२), शनिपेठ (५), निंभोरा (६) आणि फत्तेपूर (६) येथे सर्वात कमी आत्महत्यांची नोंद झाली आहे.

आत्महत्यांच्या कारणांचा विचार केला असता प्रौढ पुरुषांमध्ये दारूचे व्यसन (९०), नैराश्य (७४), कौटुंबिक कारणे (६१), कर्जबाजारीपणा (५२) आणि आजार (४४) ही प्रमुख कारणे आढळून आली आहेत. याशिवाय लग्न न जमणे, प्रेमप्रकरण, मानसिक आजार आणि परीक्षेचा ताण हीदेखील कारणे समोर आली आहेत.

महिलांमध्ये कौटुंबिक कारणे (११) आणि नैराश्य (१०) ही प्रमुख कारणे असून, काही महिलांनी आजाराला कंटाळून किंवा मानसिक आजारामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचे विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलांमध्ये नैराश्य, कौटुंबिक तणाव, शिक्षणाचा ताण, प्रेमप्रकरण आणि व्यसन, तर अल्पवयीन मुलींमध्ये कौटुंबिक कारणे, परीक्षेचा ताण आणि प्रेमप्रकरण ही आत्महत्येमागील प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या विश्लेषणानुसार सहा महिन्यांत दरमहा सरासरी ७४ तर दररोज २.४६ आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे आत्महत्या रोखण्यासाठी विशेषतः MIDC, पारोळा, अमळनेर, जळगाव तालुका आणि भडगाव या भागांत अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या केवळ १२ गुन्ह्यांची नोंद झाल्याने अशा प्रकरणांचा अधिक सखोल आणि संवेदनशील तपास करण्याची आवश्यकता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

जळगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

जळगाव पोलिसांनी नागरिकांना मानसिक आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. तणावग्रस्त व्यक्तींशी वेळेवर संवाद साधावा, व्यसनांपासून दूर राहावे, सोशल मीडियावरील नकारात्मक प्रभाव टाळावा, कुटुंबात नियमित संवाद ठेवावा, आर्थिक क्षमतेनुसारच कर्ज घ्यावे आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेनुसार शिक्षण व करिअरची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणतीही व्यक्ती गंभीर मानसिक तणावात असल्याचे किंवा आत्महत्येचा विचार करत असल्याचे आढळल्यास तातडीने आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन जळगाव पोलिसांनी केले असून, नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असल्याचेही स्पष्ट केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button