जळगाव, दि.20 (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित JCL T-20 स्पर्धेत सामने रंगतदार होत आहेत. कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेस मैदानावर सोमवारी पाचोरा एसकेटी योद्धाज आणि चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर यांनी विजय मिळवला, तर रविवारी सातपुडा हिरोजने दमदार कामगिरी करत बाजी मारली.
पाचोरा संघाने जळगाव कोगटा किंग्सवर 7 गडी राखून मात केली. कैलास पाटील (नाबाद 77) व सिद्धेश देशमुख (51) यांच्या खेळीने विजय सोपा झाला. कोगटा किंग्सकडून मनीष चव्हाणने नाबाद 58 धावा केल्या.
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने जामनेर सातपुडा हिरोजवर 4 गडी राखून विजय मिळवला. अमेय कोळी (66) व साहिल गायकर (46) यांच्या फलंदाजीने संघाला यश मिळाले.
दरम्यान, सातपुडा हिरोजने रावेर रॉयल्सवर 68 धावांनी विजय मिळवला. मितलेश चौधरीच्या नाबाद 70 धावांच्या जोरावर सातपुडाने 182 धावा केल्या व प्रतिस्पर्ध्याला 114 धावांत रोखले.
स्पर्धेचे सामने शहरातील काव्यरत्नावली चौक व नेहरू चौक येथे मोठ्या पडद्यावर प्रक्षेपित होत असून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.