जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष स्वच्छता मोहीम; वृक्षारोपणातून हरित जळगावचा संदेश
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून उपक्रम; अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, स्वच्छता आणि वृक्षसंवर्धनाची घेतली प्रतिज्ञा
प्रतिनिधी जळगाव: शासकीय कार्यालये केवळ प्रशासकीय कामकाजाची केंद्रे न राहता स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक आदर्श परिसर बनावीत, या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विशेष स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करत परिसराची स्वच्छता केली आणि विविध देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
स्वच्छता मोहिमेदरम्यान कार्यालय परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा संकलित करण्यात आला. त्यानंतर विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या प्रत्येक रोपाचे नियमित संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे, असे सांगितले. शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ, हरित आणि प्रसन्न ठेवणे ही सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच वृक्षारोपणाइतकेच वृक्षांचे संवर्धनही महत्त्वाचे असल्याचा संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जितेंद्र कुवर, उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) विजयकुमार ढगे, तहसीलदार सूर्यवंशी, उमा ढेकळे, ‘वी-ड्रीम सेवाभावी संस्था’चे प्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा समन्वय साधणारा हा उपक्रम इतर शासकीय कार्यालयांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी परिसर स्वच्छ ठेवण्याची आणि लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.