मनपाच्या ई-वाहन चार्जिंग स्टेशनचा आढावा; उत्पन्नवाढीसाठी उपाययोजनांवर भर
ई-वाहनधारकांना आकर्षित करण्यासाठी विशेष उपक्रम राबविणार
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी व स्थायी समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी झालेला खर्च, आतापर्यंत प्राप्त झालेले उत्पन्न तसेच देखभाल व संचालनासाठी होणाऱ्या खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सुमारे सात महिन्यांत चार्जिंग स्टेशनमधून अंदाजे २.५० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा सुमारे १.२० लाख रुपये आणि वीज बिलासाठी सुमारे ६ हजार रुपये खर्च होत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी चार्जिंग स्टेशनचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. इलेक्ट्रिक वाहनधारकांपर्यंत या सुविधेची माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, जनजागृती मोहीम राबविणे, डिजिटल माध्यमांतून प्रचार-प्रसार वाढविणे तसेच शहरातील इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
उपमहापौर मनोज चौधरी यांनी महानगरपालिकेच्या उपलब्ध सुविधांचा अधिकाधिक वापर करून उत्पन्नवाढ साधण्याचे निर्देश दिले. तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी चार्जिंग स्टेशनचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी प्रभावी नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
बैठकीस पर्यावरण अधीक्षक प्रकाश पाटील, विद्युत अभियंता संदीप मोरे, शहर अभियंता योगेश बोरोले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
