मतदार यादीतील नावांची प्रत्यक्ष पडताळणी करा; बीएलओच्या अहवालांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद केले.
प्रतिनिधी: जळगाव येथील भाजप कार्यालयात बूथ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना सोमय्या म्हणाले की, मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोरांची नावे असल्याचा संशय असून, मालेगावमधून हजारो नावे वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करून मॅपिंग करावे, असे त्यांनी सांगितले.
मालेगाव, मुंब्रा आणि सिल्लोड या भागांमध्ये एकगठ्ठा मतदानाचे मोठे आव्हान असल्याचे सांगत त्यांनी काही ठिकाणी मशिदींमधून मतदार नोंदणीचे फॉर्म वाटप होत असल्याचा आरोप केला. अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. प्रशासनाकडून ९९ टक्के मतदान स्लिप वाटप झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काम अपूर्ण असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. केवळ सरकारी बीएलओच्या अहवालांवर विसंबून न राहता भाजप कार्यकर्त्यांनी स्वतः घरोघरी जाऊन मतदारांची माहिती तपासावी आणि आवश्यक फॉर्म भरून घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.
गेल्या निवडणुकीतील पराभवाचा उल्लेख करत त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. एसआयआर (SIR) मोहिमेतही निवडणुकीप्रमाणेच जोमाने काम केल्यास जळगाव जिल्हा भाजपचा अधिक मजबूत बालेकिल्ला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाच्या मुद्द्यावर राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची मुंबईत भेट घेऊन याबाबत जाब विचारणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. तसेच या विषयाकडे स्थानिक आमदारांनीही गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.