राजपत्रित पदाचा दावा करणारा मनपा कर्मचारी कोण? पद वेगळं, वागणूक राजपत्रित; मनपातील कारभार संशयात
मनपात कोण खरे राजपत्रित अधिकारी? आयुक्तांकडून चौकशीची गरज
प्रतिनिधी जळगाव : महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्रशासनातील पारदर्शकता आणि शिस्तीवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. काही कर्मचारी स्वतःला राजपत्रित अधिकाऱ्यांच्या स्तराला समजून काम करत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगत आहे.
हजेरी नोंदवही व हालचाल पुस्तकात नोंद न करणे आणि मनपाचे वाहन वापरून राजपत्रित अधिकारीचा तोरा मिरवणे असे चित्र महानगरपालिकेत बघायला मिळत आहे, स्वतःला राजपत्रित अधिकारी समजणारा व्यक्ती कोण हे मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी तपासले पाहिजे. कारण याच अधिकाऱ्यावर महासभेत भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. राजपत्रित अधिकाऱ्याच्या संदर्भात पत्रकारांनी माहिती विचारल्यास ,संबंधित विभागाकडून टाळाटाळ करण्यात आली.
महापालिकेतील नियमांनुसार प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने सेवा नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना काही ठिकाणी मनमानी पद्धतीने कामकाज सुरू असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, व्यक्तीची नियुक्ती शिपाई पदावर झाली होती, असे असताना वरिष्ठ पदांवर कसे पोहोचले आणि त्यांना जबाबदाऱ्या कशा देण्यात आल्या, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
प्रशासनातील जाणकारांच्या मते, नियमबाह्य पदोन्नती किंवा अतिरिक्त अधिकार देण्यात आले असल्यास त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सेवा नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर विभागीय चौकशी, कारणे दाखवा नोटीस, वेतन रोखणे किंवा निलंबनाची कारवाई होऊ शकते. तसेच, एखादा कर्मचारी स्वतःला राजपत्रित अधिकारी म्हणून सादर करत असल्यास त्यासंबंधित आदेश व शासन मान्यता, शिक्षण पात्रता तपासणे आवश्यक असल्याचे कायदेशीर तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे महापालिकेच्या प्रशासकीय विश्वासार्हतेवर परिणाम होत असल्याची भावना कर्मचारी व नागरिकांमध्ये व्यक्त होत असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे.