Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

छत्रपती शिवाजी नगर घरकुल परिसरात विशेष स्वच्छता मोहीम; नागरिकांच्या तक्रारीची मनपाकडून तातडीने दखल


प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ अंतर्गत छत्रपती नगर व शिवाजी नगर घरकुल परिसरात नागरिकांनी केलेल्या स्वच्छतेसंदर्भातील तक्रारींची तातडीने दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमुळे परिसरातील कचरा, अस्वच्छता व साचलेल्या घाणीची साफसफाई करण्यात आली.

या मोहिमेसाठी प्रभाग समिती क्रमांक १ व २ चे अधिकारी व कर्मचारी संयुक्तपणे कार्यरत होते. मा. सदस्य विजय बांदल तसेच मा. नगरसेविका सौ. पूजा जगताप यांनी परिसरातील स्वच्छतेबाबत महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत विशेष मोहीम हाती घेतली.

स्वच्छता मोहिमेदरम्यान घरकुलधारकांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. घरातील सांडपाणी थेट रस्त्यावर सोडण्याऐवजी ते भूमिगत गटार योजनेशी आउटलेट पाईपद्वारे जोडण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे परिसरातील अस्वच्छता, दुर्गंधी तसेच डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

याशिवाय घरपट्टीची थकबाकी असलेल्या नागरिकांनी नियमित करभरणा करावा, असे आवाहनही करण्यात आले. स्थानिक करांचा वेळेवर भरणा झाल्यास महानगरपालिकेला रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य आदी नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देता येतील. तसेच अमृत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नवीन पाणी जोडण्या देण्याची प्रक्रिया अधिक वेगाने राबविता येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

महानगरपालिकेने नागरिकांना स्वच्छ, निरोगी आणि सुविधायुक्त परिसर घडविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. परिसरात स्वच्छता राखणे, भूमिगत गटार जोडणी पूर्ण करणे आणि स्थानिक करांचा नियमित भरणा करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रशासनाने नमूद केले. महानगरपालिकेच्या या विशेष मोहिमेमुळे छत्रपती नगर व शिवाजी नगर घरकुल परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button