जळगावात शिल्प हॉस्पिटल व खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटलचा उद्या संयुक्त शुभारंभ, डॉ. श्रीराज महाजन यांची पत्रकार परिषदेत माहिती
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार उद्घाटन; अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि सुपरस्पेशालिटी उपचारांची मिळणार सुविधा
जळगाव प्रतिनिधी: जळगावच्या आरोग्यसेवा क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडणार असून, शिल्प हॉस्पिटल आणि खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांचा संयुक्त शुभारंभ सोहळा शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते या दोन्ही रुग्णालयांचे उद्घाटन होणार आहे.
अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, तज्ज्ञ डॉक्टर आणि विविध विशेष उपचार सुविधांनी सुसज्ज असलेल्या या रुग्णालयांमुळे रुग्णांना अनेक प्रकारच्या उपचारांसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
शिल्प हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी, त्वचारोग व लेझर उपचार
शिल्प हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी विभागांतर्गत अपघातांमुळे झालेल्या गंभीर जखमा, हाताच्या टेंडन व रक्तवाहिन्यांना झालेल्या दुखापती, जन्मजात व्यंग, जखमा तसेच कर्करोगाशी संबंधित काही शस्त्रक्रिया व पुनर्रचनात्मक उपचारांच्या सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय हेअर ट्रान्सप्लांट अर्थात केशरोपण, कॉस्मेटिक सर्जरी, स्तनांच्या सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया, नाकाचा आकार सुधारण्यासाठी शस्त्रक्रिया, शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपचार, जुन्या जखमांचे व भाजल्यानंतरचे व्रण कमी करण्यासाठी उपचार तसेच पायांच्या फुगलेल्या नसांवरील उपचारही येथे उपलब्ध असणार आहेत.
त्वचारोग व लेझर विभागात विविध त्वचारोगांवरील उपचार, अत्याधुनिक लेझर उपचार आणि केसांशी संबंधित विविध समस्यांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये सुपरस्पेशालिटी उपचार
खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये ट्रॉमा केअर, क्रिटिकल केअर, हृदयरोग उपचार आणि विविध सुपरस्पेशालिटी वैद्यकीय सेवा उपलब्ध असतील. रुग्णालयात अत्याधुनिक अतिदक्षता विभाग (ICU), अपघात व आपत्कालीन उपचार विभाग, शस्त्रक्रिया विभाग, प्लास्टिक सर्जरी विभाग आणि अस्थिरोग विभागाचा समावेश आहे.
तसेच हृदयरोग विभागांतर्गत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, न्यूरोसर्जरी, युरोलॉजी आणि मेंदूविकारांवरील उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विविध प्रकारच्या सुपरस्पेशालिटी शस्त्रक्रियांसाठीही येथे सुविधा उपलब्ध असतील.
जळगावच्या आरोग्यसेवेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा दोन्ही रुग्णालयांमध्ये विविध वैद्यकीय विभाग आणि आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार असल्याने जळगावसह परिसरातील रुग्णांना विशेष उपचारांसाठी मदत होण्याची अपेक्षा आहे.
या संयुक्त शुभारंभ सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. श्रीराज महाजन आणि डॉ. सौ. सुभा महाजन यांनी केले आहे.
दिनांक : शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६
वेळ : सायंकाळी ५ वाजता
प्रमुख उपस्थिती : नामदार गिरीशभाऊ महाजन, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्र राज्य