Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

‘स्वच्छ जळगाव’च्या नावाखाली करदात्यांच्या पैशांची सफाई ? उपमहापौर व स्थायी समिती सभापतींच्या पत्रानंतर, चौकशी अहवालात लाखोंचा घोटाळा उघड!

डम्पिंग ग्राउंडवर कचरा खाली न करताच त्याच कचऱ्यासह वाहनांचे पुन्हा पुन्हा वजन; जळगाव मनपाच्या स्वच्छता विभागात गंभीर घोळ!


प्रतिनिधी: जळगावकरांच्या कराच्या पैशातून शहर स्वच्छतेसाठी होणाऱ्या खर्चाचा आरोग्य विभागाने नेमका कसा हिशेब दिला, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. उपमहापौर मनोज चौधरी व स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील यांनी 30 जून 2026 रोजी आयुक्तांना दिलेल्या पत्रानंतर आरोग्य, वाहन व आस्थापना विभागातील आर्थिक अनियमिततेच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली होती.

या समितीने जळगाव महानगरपालिकेच्या संबंधित विभागांच्या कामकाजाची चौकशी करताना अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत. मनपाचा स्वतःचा वजनकाटा दुरुस्त करण्यासाठी अपेक्षित खर्च सुमारे ३.१७ लाख रुपये असताना, भाडेतत्त्वावरील वजनकाट्यासाठी सुमारे ३५.०७ लाख रुपये खर्च झाल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामुळे स्वतःचा वजनकाटा दुरुस्त करण्याऐवजी भाड्याने वजनकाटा वापरण्याच्या आर्थिक औचित्यावर समितीने प्रश्न उपस्थित केला आहे.

कर्मचारी उपस्थितीबाबत प्रमाणित हजेरीपत्रकांचा ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने बायोमेट्रिक किंवा डिजिटल उपस्थिती प्रणाली लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कचऱ्यात माती-दगड मिसळून वजन वाढविण्याच्या तक्रारी, करारातील दंडात्मक तरतुदींची अंमलबजावणी न होणे, तसेच डम्पिंग ग्राउंडवर कचरा खाली न करता त्याच कचऱ्यासह वाहनांचे पुन्हा पुन्हा वजन केल्याची बाबही अहवालात मांडण्यात आली आहे. याशिवाय Scanify Code प्रणालीचा अपेक्षित वापर होत नसल्याचेही समोर आले आहे.

कचरा वाहतूक वाहनांवर GPS व डिजिटल माध्यमातून नियंत्रण ठेवणे, इंधन खर्चातील अनियमिततेची जबाबदारी निश्चित करणे, भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी प्रकरणात मक्तेदाराविरुद्ध नियमानुसार कारवाई करणे, तसेच बंद अवस्थेतील २२ वाहनांबाबत दुरुस्ती अथवा निर्लेखनाची कार्यवाही करण्याची शिफारस समितीने केली आहे.

चौकशी समितीने संबंधित आरोग्य विभागप्रमुखांची जबाबदारी निश्चित करून नियमित तपासणी, डिजिटल नोंदणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

आता प्रश्न एवढाच की—जळगाव स्वच्छतेच्या दिशेने पुढे जाणार, की जळगावकरांच्या कराच्या पैशांचा हिशेबच स्वच्छ केला जाणार? चौकशी अहवालावर आयुक्त जीवने कोणती ठोस कारवाई करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button