ताज्या बातम्या

पिंप्राळा स्मशानभूमीचा प्रश्न आता मार्गी लागणार! ‘परिपूर्ण प्रस्ताव द्या, तत्काळ मंजुरी देऊ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही; रस्ते व गटारींच्या कामांचे भूमिपूजन!

आमदार राजूमामा भोळे यांनी मानले पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांचे आभार


जळगाव, दि. २१ (प्रतिनिधी) : मागील दौऱ्यात दिलेला शब्द पालकमंत्र्यांनी पाळला. पिंप्राळा–निमखेडी परिसरातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विकासकामांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. रस्त्याचे काम दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, पिंप्राळा परिसरातील स्मशानभूमीच्या प्रलंबित मागणीचीही त्यांनी दखल घेतली. स्मशानभूमीच्या बांधकामासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करा, तत्काळ मंजुरी देऊ, अशी ग्वाही देत त्यांनी नागरिकांना दिलासा दिला. लोकांचा विश्वास हीच आपली खरी ताकद असून दिलेला शब्द पाळण्यातच लोकप्रतिनिधी म्हणून समाधान असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ व १० मधील पिंप्राळा–निमखेडी परिसरातील शिवरोड येथील रस्ते व गटारींच्या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. २१) उत्साहात पार पडले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी सभापती ड्रा चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून व श्रीफळ वाढवून कामांचा शुभारंभ करण्यात आला.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानातून हाती घेण्यात आलेल्या या कामांना मागील वर्षी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंजुरी दिली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, खासदार स्मिता वाघ तसेच महापौर व उपमहापौर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मूलभूत सुविधांच्या विविध कामांना महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. आता प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले. सध्या दुष्काळाची परिस्थिती असली तरी उपलब्ध निधी आणि प्राधान्यक्रमानुसार शहरातील विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपमहापौर मनोज चौधरी यांनी केले, तर आभार नगरसेवक अरविंद देशमुख यांनी मानले. या भूमिपूजन सोहळ्यास महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा गटनेते विष्णू भंगाळे, स्थायी समिती सदस्य तथा भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक गणेश सोनवणे, आशुतोष पाटील, अरविंद देशमुख, कुंदन काळे, सुरेश सोनवणे, माधुरी बारी, जाकिर खान, कविता भोई, कविता पाटील, अमर जैन, नरेंद्र पाटील, मानसी भोईटे व जयश्री पाटील यांच्यासह महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता मनोज वनेरे, स्थानिक पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button