Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

जळगावात पत्रकार संघटना संतप्त; खासदारांच्या कथित वक्तव्याचा निषेध,माफी आणि कारवाईची मागणी


जळगाव (प्रतिनिधी): पत्रकारांविषयी खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना, जळगाव जिल्हा यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत खासदारांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी तसेच या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, २५ जून रोजी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे पत्रकारांच्या सन्मानाला ठेच पोहोचली असून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे निषेधार्ह असल्याची भावना पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे.

पत्रकार हे समाज आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करत असून, जनतेचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतात. अशा परिस्थितीत एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य होणे दुर्दैवी असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, संबंधित खासदारांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी तसेच भविष्यात पत्रकारांच्या सन्मान व सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ व तरुण पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button