ताज्या बातम्या

जळगाव शहरात बर्ड फ्लूचा धोका टाळण्यासाठी प्रशासन सतर्क; उपमहापौरांची तातडीची आढावा बैठक


जळगाव : नवापूर शहर परिसरातील पोल्ट्री उद्योगामध्ये बर्ड फ्लू (Avian Influenza) संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. शहरात कोणत्याही प्रकारे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच नागरिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

बैठकीत शहरातील चिकन दुकाने, पोल्ट्री फार्म व मांस विक्री केंद्रांचे विशेष सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले. आजारी अथवा मृत कोंबड्यांची त्वरित नोंद घेऊन संशयित पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. तसेच बाधित भागातून येणाऱ्या पोल्ट्री वाहनांवर विशेष लक्ष ठेवून प्रवेश बिंदूंवर तपासणी मोहीम राबविण्याबाबतही चर्चा झाली.

चिकन मार्केट, कत्तलखाने आणि पोल्ट्री परिसरात नियमित सॅनिटायझेशन व फवारणी करण्याचे आदेश देण्यात आले असून अस्वच्छता आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. संशयित परिस्थिती आढळल्यास त्वरित तपासणी करणारी विशेष आरोग्य पथके तयार करण्यात येणार असून नागरिकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पूर्ण शिजवलेले अन्न सेवन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बाजार परिसरात माहितीपत्रके व सूचना फलक लावून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मृत पक्षी आढळल्यास त्यांची वैज्ञानिक पद्धतीने सुरक्षित विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांना २४ तास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याशिवाय शहरातील रुग्णालये व आरोग्य केंद्रांना ताप, श्वसन त्रास किंवा संसर्गासारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक औषधसाठा व सुरक्षा साहित्य उपलब्ध ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.

यावेळी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी म्हणाले की, “जळगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. कोणतीही हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.” तसेच सर्व विभागांनी समन्वय ठेवून दररोजचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button