विक्रम-वेताळची नवी कथा! लाचेच्या प्रश्नावर अखेर वेताळ अडकला ! २०२२ची लाचखोरी , २०२६ मध्ये न्यायालयाने सुनावली शिक्षा!
शेतजमिनीच्या नकाशातील चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी ४ हजारांची घेतली होती लाच; देवळ्यातील(नाशिक ) तत्कालीन भूमी अभिलेख उपअधीक्षक अखेर दोषी
नाशिक : देवळा तालुक्यातील चिंचवे येथील शेतजमिनीच्या नकाशामध्ये झालेली चुकीची नोंद दुरुस्त करून संबंधित प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याच्या मोबदल्यात ४ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी भूमी अभिलेख विभागातील तत्कालीन उपअधीक्षक सुरेश पर्वत वेताळ यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने २०२६ मध्ये दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
ही लाचखोरीची घटना २०२२ मध्ये घडली होती. तक्रारदाराच्या चिंचवे येथील शेतगटाचा एकत्रीकरण योजनेतील नकाशामध्ये चुकीची नोंद झाली होती. ही नोंद दुरुस्त करून मूळ प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यासाठी तत्कालीन उपअधीक्षक सुरेश वेताळ यांनी तक्रारदाराकडे ४ हजार रुपयांची लाच मागितली होती.
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने २०२२ मध्ये सापळा रचला होता .तडजोडीनंतर ठरलेली ४ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना सुरेश वेताळ यांना पथकाने रंगेहाथ पकडले होते.
या कारवाईनंतर देवळा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ तसेच १३(१)(ड) सह १३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष प्रकरण क्रमांक ०३/२०२४ अंतर्गत या प्रकरणाची सुनावणी झाली.
अखेर २०२६ मध्ये न्यायालयाने सुरेश पर्वत वेताळ यांना दोषी ठरवत कलम ७ अंतर्गत दोन वर्षांचा कारावास व २ हजार रुपये दंड, तर कलम १३(२) अंतर्गत तीन वर्षांचा कारावास व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली.
खटल्याची सुनावणी नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. व्ही. कथारे यांच्या समोर झाली. न्यायालयाने आरोपी सुरेश पर्वत वेताळ यांना दोषी ठरवत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत २ वर्षांचा कारावास व २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास, तसेच कलम १३(२) अंतर्गत ३ वर्षांचा कारावास व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता विजय गायकवाड व शिरीष कडवे यांनी कामकाज पाहिले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल कुमार नाईक यांनी कामकाज पाहिले.
तसेच कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस हवालदार प्रदीप काळोगे, पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी आणि पोलीस हवालदार विलास निकम यांनी न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला.
दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयात शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्ती लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी निर्भीडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन नाशिक परिक्षेत्राने केले आहे. तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधता येणार आहे.