Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

ब्रिटिशांचा होता काळा कायदा; सन १८७१ मध्ये जन्माला येताच काही समाजांच्या माथी ‘गुन्हेगार’चा शिक्का, पिढ्यान्‌पिढ्या सोसला होता अन्यायाचा कलंक! ३१ ऑगस्ट १९५२ रोजी हा कायदा रद्द करण्यात आला! ३१ ऑगस्ट ‘भटके-विमुक्त दिन’; जळगाव पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा सन्मान, शिक्षण व व्यसनमुक्तीचा संदेश

ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्ज अॅक्ट लागू करून बंजारा, कैकाडी, रामोशी, वडार, लमाणी, काटबूवा, कोल्हाटी, पारधी आदी अनेक समुदायांना ‘गुन्हेगार जमाती’ म्हणून घोषित केले होते.


प्रतिनिधी: दि. ३१ जुलै २०२५ रोजीच्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार, ३१ ऑगस्ट हा दिवस २०२५ पासून ‘भटके-विमुक्त दिन’ म्हणून साजरा केला जात आहे.

सन १८७१ मध्ये ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्ज अॅक्ट लागू करून बंजारा, कैकाडी, रामोशी, वडार, लमाणी, काटबूवा, कोल्हाटी, पारधी आदी अनेक समुदायांना ‘गुन्हेगार जमाती’ म्हणून घोषित केले. केवळ एखाद्या समाजात जन्माला आलो म्हणून व्यक्तीला जन्मतःच गुन्हेगार समजण्याची ही अन्यायकारक व्यवस्था होती. लहान मुलांनाही पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागत असे.

३१ ऑगस्ट १९५२ रोजी हा कायदा रद्द करण्यात आला आणि या समुदायांना या कलंकातून मुक्त करण्यात आले. त्यामुळे या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून महाराष्ट्र शासनाने ३१ ऑगस्ट हा दिवस ‘भटके-विमुक्त दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिस आणि भटके-विमुक्त समाजातील बदलते नाते आज या समाजातील अनेक कुटुंबांमध्ये सकारात्मक बदल होत आहेत. नवीन पिढी शिक्षण घेत आहे, विविध क्षेत्रांत पुढे येत आहे. त्यामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने हातभार लावणे गरजेचे आहे.

मागील इतिहासामुळे काही ठिकाणी भटके-विमुक्त समाजात पोलिसांबद्दलची नाराजी आजही जाणवते. मात्र, बदलत्या काळात पोलिस आणि समाज यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होणे आवश्यक आहे. याच संदर्भात भिगवण (पुणे) येथील पारधी समाजाच्या वस्तीला दिलेल्या भेटीतील एक अनुभव अंतर्मुख करणारा ठरला. तेथील एका व्यक्तीला समाजातील दारूचे व्यसन, गुन्हेगारी आणि इतर समस्यांबाबत विचारले असता त्याने सांगितले, “आता कुठे आम्ही मुख्य प्रवाहात वावरायला लागलो. आता कुठे पोलिस चांगले बोलायला लागले. पूर्वी नुसतंच मारायचे. आधी आम्ही जनावरासारखे होतो, गावाबाहेर राहायचो. आता पोरं शिकत आहेत. हळूहळू होईल सगळं!” या शब्दांनी भूतकाळातील वेदना आणि वर्तमानातील बदलाची दिशा स्पष्ट केली.

जळगाव पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा गौरव

‘भटके-विमुक्त दिना’चे औचित्य साधून जळगाव पोलिसांच्या वतीने भटके-विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात आमंत्रित करून त्यांच्या शैक्षणिक व इतर प्रगतीबद्दल सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांना पुस्तके भेट देण्यात आली. तसेच श्रीकांत धिवरे आणि भटके-विमुक्त विकास परिषदेचे विभाग संयोजक श्री. विकास लोहार यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांना न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पुढे जाणे, व्यसनांपासून आणि गुन्हेगारीपासून दूर राहणे तसेच शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणे, असा संदेश देण्यात आला.

सन्मानित विद्यार्थी – पल्लवी प्रकाश राठोड

– अश्विनी संतोष नन्नावरे

– प्रीती आनंदा पारधी

– अजय आप्पा चव्हाण

– नंदू सुभाष भराडी

– जयेश राजू भील

– विलास नंदलाल राठोड

इतिहासातील अन्यायाचा कलंक पुसत, शिक्षण आणि प्रगतीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात येणाऱ्या या नव्या पिढीला समाजाने आणि प्रशासनाने विश्वासाचा हात देणे हीच ‘भटके-विमुक्त दिना’ची खरी भावना आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button